माय महाराष्ट्र न्यूज:श्रीगोंदा तालुक्यातील येवती येथे वास्तव्यास असणाऱ्या एका शेतकऱ्याची शेती फसवून बळकावत ती परत देण्यासाठी तात्काळ पाच लाख रुपये द्या.! अन्यथा, एक महिन्यात एकवीस लाख रुपये द्यावे लागतील. नाहीतर, जमीन परत मिळणार नाही. असा दम देत शिवीगाळ करून, त्यास त्रास दिला.
यानंतर वारंवार गौतम आढाव या पीडिताने चुलत भाऊ रामदास आढाव याच्याकडे जमीन परत मिळवण्यासाठी विनवणी व गयावया केली. मात्र, उपयोग झाला नाही. शेवटी फसवणूक होत जमीन बळकावल्याच्या मानसिक त्रासातून गौतम आढाव यांनी १८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्यापूर्वी घराच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
तत्पुर्वी गौतम आढाव यांनी या प्रकरणाबाबत सुसाईड नोट लिहून खुलासा केल्याने, हे प्रकरण उजेडात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की, येवती गावातील रहिवासी असलेले गौतम आढाव वय वर्ष ४५ जे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेती मधून भागवत होते. त्यांच्या शेतीच्या बाजूला राहत असलेले चुलत भाऊ रामदास पोपट आढाव याने गौतम आढाव यांचे नावावर
असलेल्या साडेतीन एकर शेतीपैकी अर्धा एकर शेती विकत घेतली होती. या जमिनीच्या खरेदीबाबत कुटुंबातील लोकांना माहीत नव्हते. सहा महिन्यापूर्वी पिक विमा उतरवण्यासाठी काढलेल्या सातबाराच्या उताऱ्यावर गौतम आढाव यांचे नावावर दीड एकर जमीन असल्याचे दिसून आले. तेव्हा घरच्यांनी विचारले
असता १ वर्षापूर्वी रामदास आढाव याने श्रीगोंद्याला जायचे म्हणत, गाडीत नेऊन, पैसे देईन असे म्हणत फसवून दीड एकर शेती खरेदी करून घेतल्याचे गौतमने घरच्यांना सांगितले.ही बाब घरच्यांचा निदर्शनास आल्यानंतर नमूद प्रकाराबाबत गावातील काही मंडळी व घरातील लोक यांनी बैठक घेतली. यात रामदास आढाव याने पाच लाख रुपये द्या.! तुमची जमीन परत देतो.
नाहीतर एक महिन्यात २१ लाख रुपये द्यावे लागतील. म्हणून, रामदासचे भाऊ, वडील, आई यांनी गौतमला शिवीगाळ केली व निघून गेले.जमीन परत मिळवण्यासाठी गौतमने अनेकदा रामदासकडे विनवणी केली. वारंवार आटापीटा केला. परंतु, तुम्हाला जमीन देणारच नाही. काय करायचे ते करा ? तुमची राहिलेली जमीन सुद्धा आम्हाला द्या. असा दम रामदासने दिला. या फसवणुकीनंतर गौतम तणावात होते.
जमिनीबाबत वारंवार होणारा त्रास व या बाबतीत सतत विचारात असणारे गौतम यांनी दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरातील लोकांबरोबर जेवण करून, मुलगा व ते घराच्या पडवीत तर, पत्नी, मुलगी व आई असे घरात झोपले.१८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता पत्नी छाया झोपेतून उठल्यावर पती गौतम घरात दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी आसपास पाहण्यास सुरुवात केली.
बाहेर गेले असतील या विचारात काही काळ वाट बघितली. मात्र, ते परत न आल्याने घराच्या मागे जाऊन पाहिले असता, गौतम आंब्याचे झाडाला गळफास लागून लटकलेल्या अवस्थेत आढळले.
गौतमची पत्नी छाया यांनी हा प्रकार बघून आरडाओरडा केला. शेजारील बाळू मस्के व घरातील लोक घटनास्थळी धावत आले. गळ्यातील गळफास सोडून त्यांनी गौतमला खाली घेतले. शरीराची हालचाल होत नव्हती. ते मयत झाल्याचे त्यांना प्रथम दर्शी जाणवले.
मयताचा मावस भाऊ आप्पा तुपे यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलीसांनी गौतमच्या प्रेताचा पंचनामा केला. तर, त्यांच्या खिशात चिठ्ठी आढळुन आली. त्यामध्ये रामदास पोपट आढाव यांनी माझी जमीन बळकावली आहे. म्हणून, मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस तोच कारणीभूत असून, त्याला सोडू नये. असे लिहिले होते.
तसेच, आत्महत्येपूर्वी गौतम आढाव यांनी त्यांच्या मोबाईलवरून गणेश ट्रांसपोर्ट या व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज करून रामा आढावमुळे मी आत्महत्या करीत आहे. त्याला सोडू नये. असा मेसेज केल्याचे समोर आले. यानंतर शवविच्छेदनामध्ये गौतम आढाव यांचा गळफास लागून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी कारण नमूद केले.
मयत गौतम यांच्या पत्नी छाया आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गौतम आढाव यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या रामदास पोपट आढाव, दादा पोपट आढाव, पोपट सखाराम आढाव व जिजाबाई पोपट आढाव यांच्या विरोधात भादवि कलम ३०६, ४२०, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.