माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी देशातील कार कंपन्यांना डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री बंद करण्यास आणि इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. गडकरींनी डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन व विक्री कमी करुन इतर तंत्रज्ञानाला प्रोत्साहन द्या असे आवाहन केले आहे.
बुधवारी (दि.२५) ‘सियाम’च्या (SIAM, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स) वार्षिक अधिवेशनाला संबोधित (व्हर्चुअल संबोधन) करताना गडकरींनी देशातील वाहन उत्पादकांना हे आवाहन केले. तसेच, सरकार ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय
देणारी फ्लेक्स इंजिन वाहने पुरवण्यासाठी वचनबद्ध आहे, असे यावेळी गडकरी म्हणाले. इंडस्ट्रीने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी आर अँड डी (संशोधन आणि विकास) निधी दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
“मी वाहन उत्पादकांना आवाहन करतो की डिझेल इंजिन वाहनांचे उत्पादन आणि विक्री थांबवा. डिझेलमुळे होणारे प्रदूषण पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. इंडस्ट्रीने पर्यायी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले पाहिजे आणि पर्यायी इंधनासाठी आर अँड डी (संशोधन आणि विकास) निधी दिला पाहिजे असे ते म्हणाले.
इंडस्ट्री लवकरच E20- सुसंगत वाहने बाजारात आणेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. E20 मध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोलचे मिश्रण असते. “आमचे आयात बिल कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता आमच्या शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल,” असे ते म्हणाले.