नेवासा(तालुका प्रतिनिधी):–प्रत्येक गावातील गट नंबर कसे आहेत,जमिनीचा-दगडाचा प्रकार कसा आहे,तो किती फुटाला बदलणार आहे याची प्रचंड माहिती आमच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या विभागाकडे आहे. उपलब्ध माहितीचा उपयोग करून घ्यावा असे आवाहन जिल्हा भू-वैज्ञानिक अजिंक्य काटकर यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित “रेनवॉटार हार्वेस्टिंग-भूजल पुनर्भरणातून जल समृद्ध गाव” या विषयावर मार्गदर्शन करताना श्री. काटकर बोलत होते. जलमित्र सुखदेव फुलारी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार, तुकाराम काळे मामा, डॉ.अशोकशेठ बोरा,बाळासाहेब भणगे, उपसरपंच अयाज देशमुख,प्रवीण वंजारे, विश्वनाथ चव्हाण, सितानाना भणगे, बाबासाहेब ढवण,सिमोन वंजारे
पंकज फुलारी,बाळासाहेब निपुंगे,चांगदेव भणगे, ग्रामसेवक श्री.काळे भाऊसाहेब,नंदू जाधव, नाना मकासारे,सुभाष मकासरे,सिताराम हारदे,अनिल चेंगेडे,विनोद साळुंके,
कमलेश वर्मा यावेळी आदी उपस्थित होते.
श्री.काटकर पुढे म्हणाले,तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची आता भीती निर्माण व्हायला पाहिजे की आज जे पाणी दिसते ते उद्या आपल्याला दिसणार नाही मग काय ? आणि जेव्हा ही भीती तयार होईल तेव्हा आपण व्यवस्थित कामाला लागून भूजल पनर्भरण व जलसंधारणाची नवीन कामे करता येतील.
जलसंधारणाच्या आणि भूजल संवर्धनाच्या कामाला पैसे लागत नाही लागत नाही तर त्याला फक्त मानसिकता लागते. लोकांची मानसिकता तयार असेल तर आपल्याला पाण्याची काहीच अडचण येणार नाही. तुमच्या गावांमध्ये तुमच्या मदतीने भूजल माहिती केंद्र चालू करु यात.त्याचे माध्यमातुन तुम्हाला गट नंबर निहाय किती फुटाला कसा दगड लागतो आणि तो दगड
संपल्यानंतर किती फुटाला दुसरा दगड लागणारे ही माहिती तुम्हाला मिळेल.गावातील सर्व विहिरींची मोजणी करून भूजल पातळीची नोंद करण्यात येईल.जलमित्र सुखदेव फुलारी म्हणाले,पावसाचे रूपाने आपल्याला पाणी मिळते.काही जमिनीत जिरते तर काही वाहून जाते.त्यामुळे माणसं, जनावरे,
पशू पक्षी,शेती पिके या सर्वांचे जीवन जमिनीत जिरलेल्या भूजलावरच अवलंबून असते. भूगर्भातील पाणी विहिरी किंवा बोअरच्या माध्यमातून सातत्याने उपासले जाते.त्यामुळे जल पातळी खोल खोल आत आहे. भूजल पातळी कायम राहावी यासाठी जमिनीतील पाण्याचा उपसा कमी करणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात बांधबंदिस्ती-कँपार्टमेंट बंडिंगची कामे करावीत. शेतातील बांध वाढले तर पाणी नक्कीच वाढेल. शास्वत पाण्यासाठी सर्वांनी पावसाचे पडणारे सर्व पाणी आपापल्या जमिनीतच जिरविले पाहिजे. सर्वांनीच आपल्या शेतांचे बांध मोठे केले,वाढवले तर सर्वच्या सर्व पाणी जमिनीत जिरवून जलपातळी वाढेल. जमीन व जमिनीतील दगडाचा प्रकार यांचा अभ्यास करुनच रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलपुर्नभरणाची कामे करावेत.
प्रास्ताविक करताना नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर जोजार म्हणाले,गावाला दोन किलोमीटर लांबीचा ओढा लाभलेला आहे.पावसाचे तसेच कॅनॉलचे पाणी मिळते. परंतु जमीनीतील जल पातळी वाढत नसल्याने पाणीटंचाई निर्माण होते. त्यासाठी भूजल पुनर्भरण रेन वॉटर हार्वेस्टिंग इतर कामे करण्याची गरज आहे. भानसहिवरे गाव जलस्वयंपूर्ण व्हावे यासाठी कामे हाती घेतलेले आहे.
उपसरपंच अयाज देशमुख यांनी आभार मानले.