माय महाराष्ट्र न्यूज:प्रेमविवाहाला आईने विरोध केला म्हणून मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे.
यानंतर तिला वाचवायला दुसरी बहिण गेली तर तिचाही बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हणजे आपल्या दोन्ही मुलींच्या मृत्यूनंतर आईनेही घरी गळफास घेत
आत्महत्या केली. ही घटना मन्याळे शिवारात बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. सुनीता अनिल जाधव (40), प्राजक्ता अनिल जाधव (22) व शीतल अनिल जाधव (18, सर्व रा. मन्याळे, ता. अकोले) अशी मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी भाचा संदीप नंदराज डोळस याने फिर्यादी दिली. त्याच्या फिर्यादीनुसार, आपल्या घरासमोरच मामी सुनिता अनिल जाधव राहत होत्या. मामा अनिल जाधव यांचा 2010 मध्ये मृत्यू झाला आहे.
तर धाकटी मुलगी शीतलने 14 फेब्रुवारीला जुन्नर येथे तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, त्यास मामीचा विरोध होता. तसे त्यांनी तरुणालाही सांगितले होते.मात्र, आईच्या विरोधानंतरही शीतल बुधवारी
पतीसोबत बोलत असल्याच्या कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर रागाच्या भरात शीतल शेतात गेली. यावेळी तिला बोलावण्यासाठी थोरली मुलगी प्राजक्ताही मागून गेली. मात्र, बराच
वेळ होऊनही दोघी परत आल्या नाही. त्यामुळे सुनीताही शेतात गेल्या. त्यानंतर पुन्हा घरी येऊन त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, शीतल आणि प्राजक्ता या बहिणी घरी नसल्याने फिर्यादी डोळस आणि सरपंच
अमित कुऱ्हाडे यांनी शेतात धाव घेतली. यावेळी शीतलने विहिरीत उडी मारल्यानंतर तिला वाचविण्यासाठी थोरली बहिण प्राजक्तानेही पाण्यात उडी मारली, असे निदर्शनास आले. दोन्ही बहिणींचा विहिरीतील
पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर विहिरीतील पाणी उपसल्यावर दोघींचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.