माय महाराष्ट्र न्यूज:कापूस दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना नरमाई दिसली होती. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात पडले. बाजारातील कापूस आवकही वाढली. आज जवळपास दीड लाख
गाठी कापसाची आवक झाली होती. तर कापूस दर आज स्थिर होते.आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात चढ उतार सुरु आहेत. पण देशातील कापूस दर जास्त काळ दबावात राहणार नाहीत. कापूस
दरात पुन्हा सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता, आज वायद्यांमध्ये सुधारणा दिसली. तर प्रत्यक्ष खरेदीत दर काहिसे
नरमले होते. वायदे सायंकाळपर्यंत ८६ सेंट प्रतिपाऊंडवर होते. तर काॅटलूक ए इंडेक्स ९८.६० सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होता.आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात सध्या चढ उतार असले तरी मागणी वाढलेली आहे.
चीनकडून कापूस खरेदी सुरु आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलियातून कापसाला चांगला उठाव मिळतोय. त्यामुळं कापूस दरातील नरमाई जास्त दिवस दिसणार नाही.तसचं देशातही कापसाला चांगला उठाव आहे.
सूत आणि कापूस निर्यात सुरु झाली. सध्या नरमलेल्या दरात कापसाला चांगली मागणी आहे. त्यामुळं दरात लवकरच सुधारणा दिसू शकते.कापसाची सरासरी दरपातळी ८ हजार ५०० रुपयांच्या
दरम्यान पोहचू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.फेब्रुवारीच्या मध्यानंतर बाजारातील कापूस आवक दैनंदिन २ लाख गाठींवर पोचेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत होते. पण तसं
होताना दिसत नाही. बाजारातील आवक दीड लाख गाठींच्या दरम्यान होती. राज्यनिहाय विचार करता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक कापूस विकला. त्यानंतर गुजरात आणि तेलंगणात आवक झाली.