माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील काही भागात पुढील तीन-चार तासात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काल मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार
पाऊस झाला. धुळ्यात काल जोरदार गारपीटही झाली, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी
हा अंदाज वर्तवणारं ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यावर तीव्र दाट ढगांची गर्दी झाली आहे. तसेच नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, धुळे, नंदुरबार,
जळगाव आणि विदर्भातील पश्चिम भाग, मराठवाड्यातही दाट ढग दाटून आले आहेत.दरम्यान, राज्यातील या सर्व भागात पुढील तीन ते चार तासात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मुंबईत सकाळी सव्वा
नऊच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरु होता. तसेच पुण्यात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पावसाचं वातावण झालं होतं. त्यामुळं पुणे शहरासह जिल्ह्यातील हवेत थंडावा आहे.
दरम्यान गहू, द्राक्ष, भाजीपाल्यासह रब्बीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातही रात्रभर पाऊस सुरू होता. पावसाचा जोर आणि वादळ अधिक असल्याने गहू,मका, ही पिके शेतात आडवी
झाली असून कांदा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.