माय महाराष्ट्र न्यूज:राज्यभरातील शहरांमधील झोपडपट्टय़ांसह गाव, वाडय़ा, वस्त्या, आदिवासी पाडे, तांडय़ांवरच्या गर्भवती आणि तिच्या नवजात बाळाची काळजी
घेण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून आर. बी. जी. फाऊंडेशनने ‘माहेर योजना’ सेवेत आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू गर्भवतींना मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी
माहेर योजनेची व्हॅन महिलांच्या दारात उपलब्ध असेल. या योजनेमुळे प्रसूती काळातील गर्भवती आणि अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न राहणार आहे.गाव, खेडे, वाडय़ा-वस्त्यांमध्ये पुरेशा
आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांचे हाल होतात. वेळेत उपचार न मिळाल्याने काही जणींना जीव गमवावा लागला आहे. ग्रामीण भागातील अशा गरजू गर्भवती महिलांना चांगल्या सुविधा
देण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर गरजू गर्भवतींच्या घरी जाऊन सुरक्षित प्रसूतीची हमी देण्यासाठी आर. बी. जी. फाऊंडेशनने ‘माहेर योजने’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते शुभारंभ करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून या योजनेतून विविध भागांत २५ व्हॅन सुरू होणार आहेत.गर्भवतींची नोंद ठेवण्यापासून त्यांच्या नियमित तपासण्या, त्यावरचे उपचार, त्यासाठी
तज्ज्ञ डॉक्टर आणि अन्य कर्मचारी सेवेत असतील. ज्यामुळे प्रत्येक जणींना घरातून हॉस्पिटलपर्यंत सुखरूप नेऊन नेमके उपचार पुरविणे सोयीचे होईल, अशी माहिती आर. बी. जी. फाऊंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांनी दिली.