माय महाराष्ट्र न्यूज : राज्यात काही महिन्यापूर्वी झालेल्या बंडखोरी आणि सत्तांतरानंतर राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलून गेले आहेत. कारण त्यानंतर भाजपला कोणत्याही निवडणुकीत
म्हणावे तसे यश मिळाले नाही. म्हणजेच शिक्षक-पदवीधर मतदारसंघ आणि राज्यात लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचाच विचार आता भाजपच्या बड्या नेत्यांनी
करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्य कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.कसबा पोटनिवडणुकीत झालेल्या
पराभवानंतर पक्षांतर्गत चिंतन करण्याची भूमिका नेतेमंडळींकडून घेण्यात आली होती. पराभव का झाला, याची कारणमीमांसा केली जाईल, अशी प्रतिक्रिया अनेक भाजपा नेत्यांनी दिली होती. यानंतर आज
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश भाजपाची पुनर्रचना होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, कसबा निवडणूक निकालामुळे ही पुनर्रचना केली जाणार असल्याचा मुद्दा त्यांनी फेटाळून लावला आहे.
राज्यात या महिन्यात काही पुनर्रचना केल्या जाणार आहेत. मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण राज्यभर प्रवास करून नंतर पुनर्रचना
करावी असा विषय होता. काही ठिकाणी पुनर्रचना होईल, काही ठिकाणी नवे जिल्हाध्यक्ष येतील. काही ठिकाणी प्रदेशावर पुनर्रचना होईल. पण येत्या महिना-दीड महिन्यात पुनर्रचना होईल”, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
“ही पक्षाची कार्यकारिणी असते. निवडणुकीचा काळ आहे. अनेक कार्यकर्त्यांना त्या त्या भूमिकेत यावं लागतं. राज्यातले पदाधिकारी वेगळ्या भूमिकेत येतात. अनेक रचना कराव्या लागणार आहेत.
त्यामुळे योग्य कार्यकर्ता व नेत्याला योग्य काम देणं आणि निवडणूक जिंकण्याचं लक्ष्य यासाठी आम्ही पुनर्रचना करणार आहोत”, असेही बावनकुळेंनी स्पष्ट केले.