माय महाराष्ट्र न्यूज:अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शासनाने तात्काळ माहिती मागवली आहे. एकूण आठ जिल्ह्यांमध्ये जवळपास
13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत आलेली ही माहिती असून अजून माहिती येत आहे. आलेल्या माहितीच्या संबंधात तात्काळ मदतीचे प्रस्ताव शासनाने मागवले आहेत. शेतकऱ्यांना
तात्काळ मदत करण्यात येणार असून काल (दि.७) रात्रीच मुख्यमंत्र्यांनी याबाबत आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.८) विधीमंडळात दिली.अवकाळीमुळे झालेल्या
नुकसानीबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थगन प्रस्ताव मांडला. पावसाने शेतकऱ्यांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या शॉकने पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या परिस्थितीमुळे
शेतकरी स्वत:ला मारून घेत आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास गेला. प्रचंड नुकसान झाले. सरकार शेतकऱ्यांसाठी काय मदत करणार? केंद्र सरकारची टीम सरकार बोलावणार का? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला.
याबाबत माहीती देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये
पालघर जिल्ह्यात 760 हेक्टर काजू आंब्याचे नुकसान झाले आहे. धूळ्यात 3 हजार 144 हेक्टर केळी, पपई, ज्वारी, मका, गहू व हरभरा याचं नुकसान झाले. नंदूरबार मध्ये 1 हजार 576 हेक्टरच ज्वारी, मका, हरभरा, केळीचे नुकसान आहे. जळगाव येथे 214 हेक्टर गहू,
मका, ज्वारी, केळीचे नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यात 4 हजार 100 हेक्टर गहू आणि भाजीपाल्याचं नुकसान आहे. बुलढाणा जिल्ह्यात 775 हेक्टर मका, कांदा, गहू, हरभर पिकाचे नुकसान झाले. तर वाशीम जिल्ह्यात 475 हेक्टरवरील गहू हरभऱ्याचे
नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी विधीमंडळात दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून शेतकऱ्यांचा विषय आहे, यामध्ये राजकारण करू नका. आतापर्यंत आलेली ही माहिती आहे.
आलेल्या माहितीच्या संबंधात तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.