माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात चांगलाच ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला आव्हान
देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झालीय. महाविकास आघाडीच्या गोटात सध्या प्रचंड हालचाली घडत आहेत. महाराष्ट्रात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. राज्यातील
अनेक महत्त्वाच्या शहरांमधील महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या
पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी देखील कामाला लागली आहे.महाविकास आघाडी आता सरकार विरोधात आक्रमक भूमिकेत आहे. भाजप आणि सध्याच्या शिवसेनेला घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या
दिग्गज नेत्यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. आगामी एप्रिल ते मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार आहे. या सभांमध्ये मविआचे स्वत: उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले हे नेते
मार्गदर्शन करणार आहेत. या संयुक्त सभेपूर्वी महाविकास आघाडीचा 15 मार्चला मेळावा होणार आहे.दरम्यान विधिमंडळात अजित पवार यांच्या दालनात उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अंबादास दानवे आणि इतर
नेत्यांची आज संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण अशा विविध भागांमध्ये एकूण सहा सभा घेण्याबद्दल चर्चा झाली. या सभांसाठी नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली.