माय महाराष्ट्र न्यूज:ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
कुणी आम्हाला देशद्रोही म्हटलं तर त्याची जीभ हासडून टाकू, असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंच्या या सभेनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंच्या खेड येथील सभेबद्दल विचारलं असता नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती. पूर्वी शिवसेनाच्या सभा जाहीर व्हायच्या. खेडला उद्धव ठाकरे येणार
आहेत, असं कळाल्यावर सगळे लोक स्वत:हून सभेच्या ठिकाणी जायचे. आता तसं नाही. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणलं होतं. ही सभा विराट सभा होती, हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्च्यांमध्ये दोन लोक झोपतील एवढी
जागा सोडली होती. ही सभा विराट सभा नव्हती. सभेला स्थानिक लोक नव्हते.उद्धव ठाकरेंना राज्याच्या विकासाबद्दल आणि जनतेबद्दल काहीही बोलता येत नाही. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काहीही केलं नाही. कोकणात
अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं होते, त्याचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. त्यांनी कोकणाला कोणत्या नवीन योजना दिल्या? त्यांनी काहीही दिलं नाही. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नव्हतं. उद्धव ठाकरे अडीच वर्षात
अडीच तास मंत्रालयात गेले. त्या माणसाकडून जनता काय अपेक्षा ठेवणार… आता शिवसेना संपली आहे. त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिलं नाही. आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही त्यांच्या हाताशी
राहणार नाहीत,” असं सूचक विधान नारायण राणेंनी केलं. ते मुंबईतील विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.