माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या बारावी परीक्षा पेपरफुटीच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कठोर पावले उचलली जात असताना गणितासह तीन पेपर फुटले असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बारावी गणित पेपरफुटी प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.
या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. मुंबई क्राइम ब्रँचकडून एचएससी बोर्डाच्या गणिताच्या पेपर लीक प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांना गणिताव्यतिरिक्त भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर फुटले
असल्याची माहिती मिळाली आहे. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, गणिताशिवाय, आणखी दोन पेपर फुटले असल्याचे पुरावे सापडले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्चला गणिताचा पेपर फुटण्याआधी 27 फेब्रुवारीला
फिजिक्स आणि 1 मार्चला केमिस्ट्रीचा पेपर फुटला होता. परीक्षेच्या एक तासापूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करण्यात आले होते, असे पुरावे सापडले आहेत. गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने
सांगितले की, अहमदनगरमधील मातोश्री भागुबाई भांबरा कृषी व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील व्यवस्थापन कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल गुन्हे शाखेने जप्त केले होते. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाइलचा व्हॉट्सअॅप डेटा मिळवला
आहे. त्यातून गणिताव्यतिरिक्त भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे पेपर फुटले असल्याची माहिती समोर आली आहे. बारावी गणित पेपरफुटीप्रकरणी अहमदनगरच्या मातोश्री भागूबाई भामरे विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना
अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रान्चच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 मार्चला बारावी गणिताचा पेपर महाविद्यालयातील विद्यार्थांना एक तास आधीच मिळाला होता.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरच्या महाविद्यालयात 337 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 119 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे महाविद्यालयातच आले होते. शाळेचा निकाल 100 टक्के लागावा या उद्देशाने शाळेच्या
व्यवस्थापनाने पेपर फोडला. परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रुपये घेतल्याचे समोर आलं आहे. याचा तपास सध्या सुरु आहे.