माय महाराष्ट्र न्यूज:भाजप भ्रष्टाचाराची वॉशिंग मशीन आहे. तिथे गेल्यावर नेत्यांचे सगळे डाग धुऊन जातात, अशी टीका विरोधकांकडून भाजपवर सातत्याने केली जाते. मात्र आता खुद्द
भाजपच्याच आमदाराने आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते, ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजप आमदार रमेश पाटील
यांनी विधानपरिषदेत हे वक्तव्य केलं आहे. मात्र त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला.ठाकरे गटाने नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत
प्रवेश केला. याबाबत बोलताना रमेश पाटील म्हणाले की, आमच्याकडे गुजरातहून निरमा पावडर येते. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो. आमच्याकडे न्याय मिळतो म्हणून भूषण देसाई यांचा पक्षप्रवेश
झाला आहे. रमेश पाटील यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.रमेश पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरुन यू टर्न घेण्याचाही प्रयत्न केला. गुजरातमध्ये तयार होणाऱ्या निरमा पावडरबद्दल मी बोलत होतो. भूषण देसाई
भाजपमध्ये आले तर ते का आले? या प्रश्नावर मी बोलत होतो. भूषण देसाई यांच्यावर आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही किंवा त्यांना आम्ही बोलावलेलं नाही.त्यांना असे वाटलं असेल की, भाजप ही काम करणारी, न्याय देणारी पार्टी आहे. म्हणून त्यांना
पक्षांमध्ये यावं असं वाटलं असेल, म्हणून ते आले आहेत, असं रमेश पाटील यांनी म्हटलं. रमेश पाटील यावेळी काहीसे गोंधळलेले दिसले. भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला असतानाही रमेश पाटील
अनेकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं.