माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल लवकरच लागणार आहे. या निकालानंतर सरकार पडण्याची चाहुल लागल्याच्या भितीनेच मंत्रालयात लगबग सुरु झाली, असल्याचा
मोठा दावा नाना पटोले यांनी केला आहे.राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल, यावर भाष्य करणे योग्य नाही. परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना
काहीतरी चाहुल लागली आहे असं वाटतंय. साधारणतः सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरु असते. आम्ही सर्वोच्च न्यायलयातील
निकालाची वाट पाहत आहोत, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो
की काय या भीतीने सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले, हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा किती सत्तापिपासू आहे याचा अंतच नाही, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडताना सुरतेपासून गुवाहाटीपर्यंत काय-काय झाले, राज्यपालांनी पदाचा कसा
दुरुपयोग केला, या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी जे काही प्रश्न विचारले, निरीक्षणे नोंदवली यावर त्यांना ट्रोल केले गेले, हा ट्रोल करण्याचा प्रकार गंभीर आहे. केंद्रातील
सरकारवर कोणाचाच विश्वासच राहिलेला नाही म्हणूनच राष्ट्रपतींकडे दाद मागण्यासाठी काँग्रेस खासदार गेले आहेत.