नेवासा/प्रतिनिधी
तालुक्यातील मुकींदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमामध्ये श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्त गुरुवार दि.२३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्र कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोहळयाचे प्रमुख मार्गदर्शक महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी दिली.
प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने व अजानबाहू योगीराज भक्त प्रल्हादगिरी महाराज व स्वामी प्रकाशगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज
यांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र कथा कीर्तन
महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ यावेळेत वडाळा बहिरोबा येथून युवकांची भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असून सकाळी ९ ते ११ नेवासाफाटा येथून शोभायात्रा मिरवणूक या रॅली समवेत काढण्यात येणार आहे.
सदरची शोभायात्रा श्रीराम साधना आश्रमात आल्यानंतर संत महंतांच्या उपस्थितीत धर्मध्वजपूजन होऊन या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
श्रीराम जन्मोत्सव सोहळयाच्या निमित्ताने सकाळी १० ते १२ यावेळेत कीर्तन महोत्सव होत असून सायंकाळी ६ ते ९ यावेळेत लोणंद सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चरित्रकथाकार हभप प्रदीप महाराज नलावडे यांच्या सुश्राव्य वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांची चरित्र कथा होणार आहे.
सकाळी १० ते १२ या कालावधीत होणाऱ्या कीर्तन महोत्सवात गुरुवारी दि.२३ मार्च रोजी मुक्ताई महाराज चाळक व सौ.शिवानीताई महाराज चाळक यांच्या कीर्तनाची जुगलबंदी होणार आहे,शुक्रवारी दि.२४ मार्च रोजी विनोदाचार्य मच्छीन्द्र महाराज निकम,शनिवारी दि.२५ मार्च रोजी बीड येथील अमृताश्रम शास्त्री,रविवारी दि.२६ मार्च रोजी संत तुकाराम महाराज मंदिर व सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख वाणी भूषण उध्दवजी महाराज मंडलिक, सोमवारी दि.२७ मार्च रोजी देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज,मंगळवारी दि.२८ मार्च रोजी बीड येथील अंकुश महाराज साखरे,बुधवार दि.२९ मार्च रोजी पैठण येथील प्रसिद्ध कीर्तनकार साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य,गुरुवारी दि.३० मार्च रोजी शिवचरित्रकार प्रदीप महाराज नलावडे यांच्या कीर्तनाची कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवारी दि.३१ मार्च रोजी बीड पिंपळवंडी येथील अश्वलिंग संस्थानचे महंत गुरुवर्य महादेवानंद महाराज भारती यांच्या काल्याच्या किर्तनाने नऊ दिवस चाललेल्या कीर्तन महोत्सव व शिव चरित्र कथा सोहळयाची सांगता होणार आहे.तर याच दिवशी दुपारी ३ वाजता कुस्त्यांचा जंगी हगामा होणार आहे.नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळयामध्ये कीर्तन महोत्सवात होणाऱ्या कीर्तनाचा व शिवचरित्र कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सोहळयाचे प्रमुख संयोजक श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज व भक्त मंडळाने केले आहे.