माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या चार दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ तर सोडाच दर स्थिरही नाहीत उलट दरात दिवसागणिक घसरण सुरु झाली आहे. ऐन रब्बीचा हंगामात शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असताना
दर घसरत असल्याने शेतकरी दुहेरी संकटाला सामोरा जात आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचे योग्य नियोजन केले तर फायद्याचे राहणार आहे.त्यामुळे सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे.
शेतकऱ्यांच्या या मनातील प्रश्नाचे उत्तर दिले आहे ते कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी. खरीप हंगामातील एकही पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. प्रतिकूल परस्थितीमध्येही सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. पण पावसाने सोयाबीन हे खराब झालेले आहे.
त्यामुळे खराब माल साठवून अजून नुकसान करुन घेण्यापेक्षा त्याची विक्री करावी व चांगल्या मालाची साठवणूक करण्याचा सल्ला कृषीतज्ञ रामेश्वर चांडक यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे.
सोयाबीनची साठवणूक करावी की यापेक्षा दर कमी होतील म्हणून विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. मात्र, पावसाने खराब झालेल्या मालाची साठवणूक केली तर तो अधिक खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिळेल त्या दरात खराब
सोयाबीनची विक्री ही शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार आहे. तर चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक केली तर भविष्यात दर वाढले तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे,सोयाबीनची काढणी-मळणी कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी
आता रब्बीच्या तयारीला लागलेला आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीनची बाजारपेठेतील आवक ही वाढलेली आहे. मंगळवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 13 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यामध्ये अधिकतर सोयाबीन हे डागाळलेले होते.
पावसाने सोयाबीनची खराबी झालेली आहे. त्यामुळे साठवणूक करुनही याचा फायदा नसल्याने शेतकरी विक्रीला आणत आहेत. तर बाजारात मालाच्या दर्जाप्रमाणे दर मिळत आहे. मंगळवारी सोयाबीनला सरासरी 4 हजार 800 चा दर मिळाला आहे.
सध्या सोयाबीनचे दर खालावले त्यामुळे डागाळलेल्या सोयाबीनची विक्री केली तरी चांगल्या प्रतिच्या सोयाबीनची साठवणूक शेतकरी करु शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आताच पैशाची आवश्यकता नाही अशा शेतकऱ्यांनी साठवणूक करण्यास हरकत
नसल्याचा सल्ला व्यापारी अशोक आग्रवाल यांनी दिला आहे. चांगले सोयाबीन साठवणूक करुन ठेवले तरी त्याला धोका निर्माण होत नाही. शिवाय शेतीमाल तारण योजनेचाही शेतकरी फायदा घेऊ शकतात.