माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून शहरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार माऊली डेकोरटर या फर्मचा चालक असलेला कृष्णा सुभाष करपे (वय 28, रा.कुंभारआळा) हा तरुण एका कार्यक्रमाची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सोमवारी (ता.25) सायंकाळी संगमनेर खुर्द शिवारातील कुबेर लॉन्स येथे गेला होता.
आज पहाटे साडेबाराच्या सुमारास त्याचे कामकाज आटोपल्यानंतर तो घरी येण्यासाठी आपल्या स्वीफ्ट कंपनीच्या कारमधून (क्र.एम.एच.03/ए.एम.9981) निघाला. यावेळी संगमनेर खुर्द शिवारातील शिवनेरी पतसंस्थेपासून संगमनेरच्या दिशेने वळण घेत
असताना त्याचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो थेट समोरुन येणार्या मालट्रकवर जावून आदळला.हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर स्वीफ्ट कारच्या दर्शनीभागासह डाव्या बाजूचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघाताने मोठा आवाज झाल्याने
आसपासच्या काही नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी कारमध्ये रक्ताच्या थारोळ्यात फसलेल्या तरुणाला स्थानिकांनी बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. मयत झालेला तरुण शहरातील सर्वपरिचित व्यापारी सुभाष करपे यांचा एकुलता
एक मुलगा, तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर करपे यांचा तो पुतण्या होता. त्याच्या पश्चात आई-वडील व तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.