माय महाराष्ट्र न्यूज:आयसीएमआरचे शास्त्रज्ञ सुमीरन पांडा यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी सांगितलं, ‘नवा डेल्टा व्हॅरिएंट जास्त संसर्गक्षम वाटत आहे. तसंच तो यापेक्षाही जास्त संसर्गक्षम असू शकतो. विषाणू स्वतःला जिवंत राखण्यासाठी
स्वतःमध्ये असे बदल करत जातो. कारण त्याला होस्टचं शरीर म्हणजेच मानवी शरीरात राहण्याची आवश्यकता असते; मात्र हा व्हॅरिएंट घातक आहे की नाही, याबद्दल आत्ताच काही सांगणं कठीण आहे.देशभर पसरलेली कोरोना विषाणूची दुसरी लाट आता आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे.
लसीकरणाचं प्रमाणही वेगाने वाढत आहे. यादरम्यान, कोरोना विषाणूच्या AY.4.2 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तथापि हा व्हेरिएंट अधिक संसर्गक्षम वाटत असला, तरी घातक असल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही, असं मत इंडियन
काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. तरीही नागरिकांनी कोविडच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे. आतापर्यंत देशात कोरोनाच्या AY.4.2 या व्हेरिएंटचे 17 नमुने सापडले आहेत.
पांडा यांनी सांगितलं, की ‘AY.4.2 हा व्हॅरिएंट अद्याप व्हॅरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून ओळखला जात आहे. त्यावर संशोधन सुरू आहे. क्लस्टरवर आधारित अभ्यासातून येत्या काही दिवसांत या व्हॅरिएंटची वैशिष्ट्यं उघड होतील.’
पांडा यांच्या म्हणण्यानुसार, लसीकरण करून घेणं आणि मास्कचा वापर करणं या दोन्ही गोष्टींचा अवलंब आवश्यक आहे. ‘कोरोनाचा व्हॅरिएंट जुना असो ना नवा, त्यांचा फैलाव होण्याची पद्धत एकसारखीच आहे. त्यामुळे मास्क वापरा आणि सार्स-सीओव्ही टूला हरवा.
मास्क संसर्ग होण्यापासून बचाव करेल. संसर्ग झालाच तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासूनचं आणि मृत्यूची शक्यता कमी करण्याचं संरक्षण लस देईल. म्हणून लस आणि मास्क या दोन गोष्टींचं पालन केलं, तर कोणताही व्हॅरिएंट किंवा म्युटेशन असलं, तरी काही फरक पडत नाही,’ असं पांडा यांनी नमूद केलं.