माय महाराष्ट्र न्यूज:शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे. मुंबईत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे राष्ट्रवादीचे मनपाचे माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे यांनी
आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासह किरण शिंदे, संतोष धनगर, विजय शिंदे, अंकुश धनगर, चंदर शिंदे, गोरख धनगर आदींसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मागील आठवड्यात भाजप, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी या पक्षांतून काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यानंतर आता शिंदे यांच्यासारखा सावेडी उपनगरातील मोठा राजकीय मासा काँग्रेसने गळाला लावल्यामुळे काळे यांचे शहरातील राजकीय वजन वाढले आहे.
बाळासाहेब भुजबळ यांची प्रदेशाध्यक्षांनी पक्षातून हाकलपट्टी केल्या नंतर पक्षात सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे ना.थोरात, आ.पटोले मात्र काळे यांच्या कामगिरीवर खूष आहेत. दशरथ शिंदे हे राष्ट्रवादीकडून दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. मनपाचे विरोधी पक्षनेते पद देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भूषविले आहे.
राष्ट्रवादीच्या भटके-विमुक्त आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष होते. आ. जगताप पिता-पुत्रांच्या नेतृत्वाला वैतागून त्यांनी दिवंगत शिवसेना उपनेते अनिलभैय्या राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. स्व. राठोड यांच्या निधनानंतर ते शिवसेनेपासून काहीसे अलिप्त असल्याचे जाणवत होते. दोन आठवड्यांपूर्वी
त्यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे सावेडीमध्ये काँग्रेसला शिंदे यांच्या रूपाने मजबूत नेतृत्व मिळाले आहे.