माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या चार वर्षाच्या तुलनेत
महाराष्ट्र राज्य मध्ये यावर्षी चिकुन गुनियाचा प्रसार वेगाने वाढला आहे. ऑक्टोबरमध्येच रुग्णसंख्येने दोन हजाराचा आकडा पार केला आहे. पाच वर्षांपूर्वी २०१६ मध्ये राज्यात २ हजार ९४९ रुग्ण आढळले होते.
राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव मात्र वाढला आहे. राज्यात २०१६ साली चिकुनगुनियाचा उद्रेक वाढल्यानंतर २०१७ पासून दरवर्षी प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
मात्र या काळात रुग्णसंख्या दोन हजारांपेक्षा कमी राहिली. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त चिकुन गुनियाच्या चाचण्या फारशा झाल्या नाहीत. त्यामुळे रुग्णसंख्येत मोठी घसरण झाल्याचे आढळले. २०२० मध्ये चिकुन गुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते.
यावर्षी मात्र चिकुन गुनियाचा प्रसार वेगाने झाला असून जानेवारी ते ऑक्टोबर या काळातच २ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. चिकुनगुनिया आणि डेंग्यूचा प्रसार हे एडिस इजिप्ती या एकाच डासापासून होत असल्यामुळे डेंग्यूचा फैलाव वाढला की चिकुनगुनियाचा प्रसारही वाढतो.
राज्यात २०१८ पासून डेंग्यूचा प्रसार वाढत असल्याने चिकुनगुनियाचे प्रमाणही वाढत आहे. चिकुनगुनिया हा डासांमुळे होणारा आजार आहे. हा आजार प्रामुख्याने आशिया, आफ्रिका, युरोप आणि अमेरिकेत आढळणारा आजार असून तो दिवसेंदिवस धोकादायक बनत चालला आहे.
वरील प्रजातीच्या मादी डासांनी चावल्यास चिकुनगुनियाचा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. डासांनी चावल्यानंतर रुग्णांमध्ये साधरण ४ ते ६ दिवसांनंतर लक्षणे दिसून येत नाही. हे डास सहसा दिवसा आणि दुपारी चावतात आणि चिकुनगुनियाचे डास घराबाहेर चावतात.
तथापि, ते घरामध्ये देखील प्रजनन करू शकतात.चिकुनगुनिया या आजारात मृत्यूचे प्रमाण शून्य असले तरी तापानंतर होणारी सांधेदुखी जास्त त्रासदायक आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास अधिक होतो. काही रुग्णांना तीन महिन्यांहून अधिक काळ सांधेदुखीचा त्रास होतो.
त्यामुळे याचे वेळीच निदान करून उपचार सुरू करणे आवश्यक आहे. परंतु अनेकदा चाचण्यांमधूनही याचे निदान होत नसल्यामुळे लक्षणे आणि रक्ताच्या इतर चाचण्यांवरून आजाराचे निदान केले जाते, असे डॉ. जयेश लेले यांनी सांगितले.
आता या आजाराची काही सामान्य लक्षणे पाहू या-
लक्षणे
1. अचानक ताप
2. हाडांमध्ये वेदना
3. स्नायू दुखणे
4. डोकेदुखी
5. नोसिया
6. थकवा
7. पुरळ उठणे