माय महाराष्ट्र न्यूज:विधान परिषदेसाठी अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर अखेरीस होत आहे. या निवडणुकीसाठी या आठवड्यात पडद्याआड अनेक राजकीय घाडामोडी सुरू झाल्या आहेत. आ.अरुणकाका जगताप 10 वर्षांपासून
या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. यावेळी त्यांना उमेदवारी मिळणार की नाही, यापासून चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेला जिल्हा बँक निवडणुकीत पडद्याआड घडलेल्या घडामोडींची किनार आहे. उमेदवारी कोण करणार, हा प्रश्न चर्चेत असताना
माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे मनसुबे स्पष्ट करताच चर्चेचा रोखही बदलला आहे. त्यांनी एकाचवेळी पक्ष आणि संभाव्य स्पर्धकांवर दबाव वाढविण्यासाठी डाव टाकण्यास सुरूवात केल्याचे मानले जाते.
दुसरीकडे कर्डिलेंनी भाजपवर उमेदवारीबाबत अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला असला तरी पक्षातील अन्य इच्छुकांनी पडद्याआड डाव टाकले आहेत. कोपरगावच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव प्रामुख्याने समोर येत आहे. त्यांच्या समर्थकांनी सुरू केलेल्या हालचाली विधान परिषदेच्या तयारीचे संकेत देत आहेत.
महिनाभरात राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांशी कोल्हे यांची झालेली चर्चा ही याचनिमित्ताने होती, असा दावा केला जात आहे. पक्ष म्हणून भाजपचे काही बेरजेचे राजकारण आहे, त्याची पूर्ती करण्याचे धाडस कोल्हेंकडे आहे, याकडे काहींनी आवर्जून लक्ष वेधले.
विधान परिषदेत महिलांचे प्रतिनिधीत्व अत्यल्प आहे. त्यामुळे कोल्हेंच्या निमित्ताने महिला नेत्याला संधीची अपेक्षाही समर्थकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कोल्हेंशी संपर्क साधणारे नेते विविध पक्षातील असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.
एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्याकडे चाचपणी केली जात असताना महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनीही कोल्हे कुटुंबाकडून राजकीय स्थितीचा आढावा घेतला आहे. कर्डिले यांनी विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना पाठविलेल्या दिवाळीच्या
मिठाईची चर्चा झडताच, कोल्हेंनी तर हजारावर फराळाचे बॉक्स आधीच रवाना केले होते. त्याचीही चर्चा करायची का, असा सवाल एका भाजप नेत्याने खासगीत बोलताना केला. एकूणच विधान परिषदेच्या निमित्ताने राजकीय स्थिती रंगतदार झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीबाबत भाजप नेत्या स्नेहलता कोल्हेंकडून अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत नाहीत. नगर जिल्ह्यासह वैजापूर, येवला, सिन्नर या शेजारच्या मतदारसंघात साखर कारखानदारीच्या निमित्ताने कोल्हे कुटुंबाचा वावर आहे.
त्यांना बळ दिल्यास पक्षाचाच फायदा होणार आहे, असे राजकीय गणित त्यांच्या समर्थकांनी पक्षश्रेष्ठींच्या कानी घातले आहे.