माय महाराष्ट्र न्यूज:सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचं नाव सर्वांत वर आहे. ते सध्या भारतीय जनता पक्षात आहेत. त्यांनी वेळप्रसंगी राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवण्याची
तयारी केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण त्यांनी नुकतेच दिवाळीनिमित्त सर्वांना पाठवलेल्या शुभेच्छापत्रांत भारतीय जनता पक्षाचा अजिबात उल्लेख केलेला नाही. यावरूनही या चर्चेनं जोर पकडला आहे.
कर्डिले यांनी या आधी राष्ट्रवादीकडून राज्यात कॅबिनेट मंत्रीपद उपभोगलं आहे. सन २००९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांचा नगर तालुका मतदार संघ तोडून त्यांतील गावे राहुरी, श्रीगोंदे व पारनेर विधानसभा मतदारसंघांना जोडली गेली. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेशकरून २००९ मध्ये राहुरी मतदारसंघातून
निवडणूक लढवली. २००९ व २०१४ च्या निवडणुकांत त्यांनी राहुरी मतदार संघातूनच विजय मिळवला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर तसे कर्डिले भाजपमध्ये अस्वस्थच असल्याचं बोललं जात आहे. कारण राष्ट्रवादीनं कर्डिले
यांना शह देण्यासाठी तनपुरे यांना थेट राज्यमंत्रीपद दिलं. तनपुरे यांनी आधीपासून तरुणांत लोकप्रियता मिळवली. आता तर मंत्रीपदानंतर ती अधिकच वाढली आहे. त्यामुळे राहुरी मतदारसंघात त्यांना पुढील निवडणुकीतही प्रतिस्पर्धी त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही, अशी स्थिती आहे. पारनेर मतदारसंघातही असंच आहे.
श्रीगोंदे मतदार संघात नगर तालुक्यातील नेत्याला काहीही स्थान नाही. कर्डिले यांना आता सुरक्षित मतदारसंघच राहिला नाही. अशा वेळी त्यांच्यासमोर फक्त विधान परिषदेचाच पर्याय उरलेला आहे.सध्या कर्डिले भाजपच्या प्रत्येक कार्यक्रामात व्यासपीठावर नेत्यांच्या खाद्याला खांदा लावून आपलं अस्तित्व दाखवून देत आहेत.
पण, तापर्यंत धक्का देण्याच्या त्यांची कार्यपद्धती पाहता ऐनवेळी काहीही निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तरीही त्यांच्यासमोर तालुक्यांतील महाविकास आघाडीच्या म्हणजे शिवसेना व राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या विरोधाचं आव्हान आहे.
सध्या नगरमधून विधान परिषदेसाठी अरुण जगताप आमदार आहेत. ते सलग दोनवेळेस आमदार झाले. आता ते या निवडणुकीसाठी उत्सुक नसल्याचं बोललं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कर्डिले यांचे प्रयत्न असल्याचं बोललं जातं. जगताप कर्डिले यांचे व्याही आहेत. तेही कर्डिले यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं.
नगरच्या महापालिकेतील विधान परिषदेच्या मतांपैकी जगताप यांच्या प्रभावाखालील किमान ६० मते कर्डिले यांना मिळू शकतात. महापालिकेच्या एकूण ७२ पैकी शिवसेनेची काही मतं कर्डिलेंना मिळणार नाहीत. उरलेली मतं ‘मिळवण्याची’ मात्र कर्डिले यांची ताकद आहे. जिल्ह्यात सध्या नगर शहर,
राहुरी, पारनेर, कर्जत-जामखेड, कोपरगाव व अकोले या मतदार संघांत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अकोले वगळता सर्व आमदारांचं स्थानिक स्वराज्य संस्थांत बऱ्यापैकी वर्चस्व आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अनुकूल मानली जाते. मुळात विधानसभेची निवडणूक ‘खर्चिक’ मानली जाते.
मर्यादित मतं असतात. ती मिळवण्यासाठी मोठा ‘खर्च’ येतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे ‘मनी व मसल’ पॉवर असणाऱ्याला ही निवडणूक त्यातल्या त्यात सोपी मानली जाते. कर्डिले त्यात मुरलेले आहेत. एकूण परिस्थिती पाहता कर्डिलेंची पावलं राष्ट्रवादीकडे न वळल्यास काहीही नवल नाही.
दरवर्षी कर्डिले दिवाळीनिमित्त फराळाचा कार्यक्रम आयोजित करतात. यंदा त्यांनी तो ५ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. त्यासाठी कर्डिले यांनी शुभेच्छा पत्रे छापून घेतली आहेत. त्यांवर त्यांनी आपल्या पक्षाचा अजिबात उल्लेख केलेला नाही. शक्यतो कुठलाही राजकीय नेता आपल्या विद्यमान पक्षाचा
अनुल्लेख करण्याची अशी ‘चूक’ करत नसतो. त्यामुळे कर्डिलेंच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेनं अधिकच जोर पकडला आहे. तसं झाल्यास नगर व शेजारच्या तालुक्यांत बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे.