माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यातील सोयर्या धायर्यांचे राजकारण हा राज्यात चर्चेचा विषय असतो. जिल्ह्यातील अनेक मातब्बर घराण्यांचे स्नेहबंध जुळल्याचे राज्याने बघितले आहे. आता ताज्या घडामोडीनुसार आजवर एकामेकांचे कट्टर
राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या दोन मातब्बर घराण्यातील तिसर्या पिढीत रेशीमगाठीचा योग जुळून आला आहे.जिल्ह्यात कारखानदारीतील मातब्बर घराण्यांनी येथील राजकारणावर वर्चस्व राखले. राजकारण कितीही टोकाला गेले तरी कौटुंबिक स्नेह जपण्याचा प्रयत्न झाला.
त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पक्ष कोणताही असला तरी सत्ता सोयर्या-धायर्यांचीच असते, असे गमतीने म्हटले जाते. नव्या घडामोडींनुसार एकमेकांना खेटून असलेल्या उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मातब्बर घराण्यांमध्ये सोयरिक जुळून आली आहे.
आजवर या घराण्यांमध्ये तीव्र राजकीय स्पर्धा दिसून आली. विधानसभा निवडणुकीत एकामेकांना पाडापाडीचे राजकारण झाले. सहकारी साखर कारखाना चालविताना उसाचे दर जाहीर करण्यावरून आणि शेतकर्यांना पेमेंट करतानाही एकमेकांना खिंडीत
गाठण्याचे प्रयत्न झाले. कधीकाळी एकाच पक्षात राहून पडद्याआड एकमेकांसमोर आव्हान उभे करण्याचे प्रयत्न झाले. मात्र या घराण्यातील तिसरी पिढी हा संघर्ष मागे सोडून नातेसंबंधांचा नवा ‘उदय’ घडविण्याच्या मार्गावर आहे.
दोन्ही मातब्बर घराण्यांतून लग्नासंबंधी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्या पिढीला देण्यात आले. दोन्ही घरात सध्या राजकीय सत्ता आहे. त्यामुळे अत्यंत सावधपणे पुढील वाटचाल सुरु आहे. आगामी 10 दिवसांत सोयरिकीचा आनंदक्षण साजरा होईल, अशी माहिती आहे.
दरम्यान, या घडामोडींचा पुढील राजकारणावर काही परिणाम होणार की नाही, याबाबत आताच अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरणार असले तरी तशी चर्चा होण्याची दाट शक्यता मात्र आहे.