माय महाराष्ट्र न्यूज:दिवाळीच्या तोंडावर अनेक राज्यांमधले नागरिक निष्काळजीपणे वर्तणूक करत असल्याचं दिसत आहेत. बाजारात अनेक जण मास्क न लावता आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता गर्दी करत आहेत. याशिवाय देशातल्या
अनेक राज्यांमध्ये AY.4.2 हा कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचा नवा प्रकार समोर येत असून, देशातील तिसऱ्या लाटेस हा प्रकार कारणीभूत ठरू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत भारताला भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला. या कालावधीत बाधित रुग्ण संख्या आणि मृत्यूच्या आकडेवारीनं नवा उच्चांक गाठला होता. या दरम्यान देशातली आरोग्यव्यवस्था अडचणीत आली.
या कालावधीत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला. आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे. दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यानं सणासुदीच्या काळात नागरिकांनी मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सिंगचं
पालन करावं, असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकार वारंवार करत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी लसीकरण प्रतिबंध करू शकत नाही, तर केवळ त्याची तीव्रता कमी करते, असा इशारा दिला आहे.
सणासुदीच्या काही आठवड्यांपूर्वी केंद्रानं राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितलं होतं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं, की कोणत्याही विपरीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी SOP जारी करण्यात आली होती.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले कंटेन्मेंट झोन आणि जिल्ह्यांमध्ये गर्दी वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या मेळाव्यास परवानगी देऊ नये.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जगभरात AY.4.2 बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. `डीएनए` या न्यूज
वेबसाइटच्या वृत्तानुसार, जगभरात AY.4.2 या वेरिएंटने बाधित असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 26,000 असल्याचं नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. यावरून हा वेरिएंट डेल्टा वेरिएंटच्या तुलनेत 15 पट संसर्गजन्य असल्याचं स्पष्ट होतं.