माय महाराष्ट्र न्यूज: वाळू तस्करांकडून पथकावर हल्ले करण्याच्या घटना नेहमी घडतात. आता खडीची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडूनही अधिकाऱ्यांवर हल्ले होऊ लागले आहेत. अहमदनगर तालुक्यातील कापूरवाडी येथे कारवाईसाठी
गेलेल्या मंडल अधिकाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडल अधिकारी जीवन भानुदास सुतार यांच्या बाबतीच ही घटना घडली. नगर तालुक्यातील कापूरवाडी ते वारूळवाडी रोडवरील बुर्हाधणनगरजवळ ही घटना घडली. यामध्ये मंडल अधिकारी सुतार हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भागात अवैध खडी वाहतूक सुरू असल्याची माहिती मंडल अधिकारी व तलाठी यांना मिळाली होती. त्यानुसार ते कारवाईसाठी गेले. खडी वाहतूक करणारे वाहन त्यांनी अडविले. त्यावेळी आरोपींनी मंडल अधिकारी जीवन सुतार यांच्या डोळ्यात लाल मिरची पूड फेकली.
त्यांच्यासोबत असलेले तलाठी गणेश दत्तात्रय जाधव यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हनीफ हसीनभाई पठाण, हसीनभाई चाँद पठाण (दोघे रा. अमीरमळा, बुर्हाधणनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, यासोबतच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमांचा भंग केल्याचाही गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.