माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील पावसाळी वातावरण निवळेल, असा आशावाद निर्माण झालेला असताना मंगळवारी मुंबईसह उपनगरात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. हवामान खात्याने
कोणताही इशारा दिला नसताना अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. दरम्यान, आता पुढील ४ दिवस राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचं अवकाळीने आणखीच टेन्शन वाढवलं आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं शेतपिकांचं
मोठं नुकसान झालं आहे. त्यातच गारपीटीने तडाखा दिल्याने रब्बी हंगामातील पिकांची नासधूस झाली आहे. वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेला शेतमाल मातीत गेल्याने बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहेत.
श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंतच्या हवेच्या जाडीत दक्षिणोत्तर पसरलेला हवेच्या कमी दाबाचा आस आणि त्यातून महाराष्ट्राच्या भूभागावर तयार झालेली वारा खंडितता प्रणाली
यामुळे मंगळवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार, २५ मार्चपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर,
ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा,
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.दुसरीकडे नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे.
जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.