नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील स्थानिक भाविकांना शनि चौथरयावरील मोफत व्हीआयपी शनिदर्शन देण्यात येईल असा निर्णय शनिशिंगणापुर देवस्थान व प्रहारच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी दिली.
दि.२ एप्रिल २०२३ रोजी शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पाचशे रुपयांच्या विषयावर देवस्थान ट्रस्ट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अप्पासाहेब ढूस, प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, प्रहार कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे तसेच शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट कडून देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर , उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे, उपव्यवस्थापक अनिल दरंदले बैठकीस हजर होते.
यावेळी प्रहार जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांनी परिसरातील स्थानिक नागरिकांना शनि चौथऱ्यावर जाऊन मोफत दर्शन देण्याची मागणी मागणी केली. शनि महाराजांच्या मुर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी व मूर्तीला स्पर्श न करता भाविकांना तेल अर्पण करण्यासाठी एक तेल कुंडाची निर्मिती करून पाईपद्वारे शनि देवाच्या मूर्तीवर तेल जाण्याची व्यवस्था करावी या आणि इतर सूचना केल्या.
यावर शनि देवस्थानचे अध्यक्ष भागवत बनकर यांनी सांगितले की, प्रहारचे मागणी नुसार परिसरातील स्थानिक भाविकांना मोफत (वीनापास) दर्शन देऊ व स्थानिक असल्याचा पुरवा म्हणून आधार कार्ड गृहीत धरून व्हीआयपी दर्शन उपलब्ध करून देण्याबाबदचा सकारात्मक निर्णय विश्वस्त मंडळाच्या पुढील मीटिंग मध्ये घेण्यात येईल.तसेच चौथरा वाढवणे,दर्शन रांगेचे बांधकाम व इतर कामे प्रगतीपथावर असून दोन महिन्यात ते पूर्ण करून भाविकांना सुखद दर्शन देण्याची व्यवस्था आम्ही तात्काळ करणार असल्याचे अध्यक्षांनी व उपस्थित देवस्थान कमिटीतील सदस्यांनी सांगितले.
*आ.शंकरराव गड़ाख यांना धन्यवाद..*
प्रहार जनशक्ती पक्षाने पुकारलेले आंदोलन होण्याआधीच आमदार शंकरराव गडाख यांनी घडवून आणलेल्या समन्वय बैठकीमध्ये चांगले निर्णय झाले असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार शंकरराव गडाख व शनि देवस्थान ट्रस्ट कमिटीचे आभार मानले.