Sunday, June 4, 2023

कमी पाण्यात जास्त उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

कमी पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या प्रत्येक थेंबास महत्व आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते आणि पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’ राबविण्यात येत आहे.

पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांची व्याप्ती वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी सूक्ष्म सिंचन प्रणालींची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, असा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खर्चाच्या ४५ ते ५५ टक्के इतके अनुदान देण्यात येते. त्यामध्ये अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या ५५ टक्के किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५५ टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान दिले जाते. तर इतर शेतकऱ्यांना संचाच्या अनुज्ञेय खर्चाच्या ४५ टक्के अथवा प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या ४५ टक्के यापैकी जी कमी असेल ती रक्कम दिली जाते. तसेच या योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी हा अटल भूजल योजनेत निवड झालेल्या गावातील असल्यास त्यास अटल भूजल योजनेचा लाभ दिला जातो. तर इतर लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत पूरक अनुदानाचा लाभ दिला जातो. याअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना २५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पुरक अनुदान देण्यात येते. असे एकूण अनुक्रमे ८० ते ७५ टक्के मर्यादित अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘महाडीबीटी’ या पोर्टलवर शेतकरी योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ७/१२ व ८ अ चा उतारा, समाईक क्षेत्र असल्यास साध्या कागदावर इतर खातेदारांचे संमतीपत्र, शेतजमीन भाडेतत्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनांचा लाभ घेताना अर्ज मंजूर झाल्यापासून ७ वर्षांच्या कालावधीसाठी लाभार्थ्याने शेतमालकाशी केलेला नोंदणीकृत करार, ७/१२ उताऱ्यावर विहीर, शेततळे इत्यादींवर सिंचन सुविधांची नोंद नसेल तर याचा साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यासाठी) इ. कागदपत्रे जोडावीत.

सूक्ष्म सिंचनामध्ये पाणी हे थेट पिकास दिले जाते. ठिंबकमुळे पाण्याची ३० ते ८० टक्के बचत होते. वाफसा स्थिती कायम राहत असल्याने पिकांची जोमदार आणि सतत वाढ होते. पिकाला गरजेनुसार पाणी मिळते. मुळाच्या कार्यक्षेत्रात पाणी, माती आणि हवा यांचा समन्वय साधला जातो. कमीत कमी वेगाने पाणी दिले जात असल्याने मुळाच्या सभोवती ते जिरते, त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होऊन दर्जेदार उत्पादन मिळते. द्रवरूप खते देता येतात. खतांचा १०० टक्के वापर तर होतोच शिवाय खताच्या खर्चात ३० ते ३५ टक्के बचत होते. खताचा अपव्यय टळून सम प्रमाणात खते देता येतात. जमिनीची धूप थांबते त्याचबरोबर तणांवर नियंत्रणास मदत होते.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हे शासनाचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याअनुषंगाने पाण्याची कमी उपलब्धता असणाऱ्या प्रदेशात सिंचनाच्या चांगल्या सुविधा उभारून त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा उद्दीष्ट साध्य करण्यासाठीचा मार्ग आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविण्यासाठी ठिबक सिंचन हे कमी पावसाच्या प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच वरदान ठरत आहे.

*संकलन-उप माहिती कार्यालय, शिर्डी*

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!