अहमदनगर
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक या संस्थेच्या मुख्य इमारतीमधील सभागृहाचे आता “श्री.पा. कृ. नगरकर सभागृह” असे नामकरण होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दि.६ एप्रिल रोजी याबाबदचा शासन निर्णय जारी केला आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) नाशिक ही महाराष्ट्र राज्याची अग्रगण्य अभियांत्रिकी संस्था आहे. सदर संस्था गेल्या ६३ वर्षापासून जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या क्षेत्रात महाराष्ट्र राज्य तसेच भारतातील इतर राज्यांना सेवा देत आहे. मेरी संस्थेतील पूर्वीचे मुख्य अभियंता व सहसंचालक श्री.पा.कृ. नगरकर यांनी त्यांचे संस्थेमधील प्रदिर्घ सेवा कार्यकालात संशोधन समस्यांचा अभ्यास, चाचण्यांची कामे, संशोधन लेख इ. बाबतच्या भरीव कामगिरीद्वारे मेरी, नाशिक संस्थेचा नावलौकिक वाढविण्यास मोठा व मोलाचा हातभार लावला आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी), नाशिक या संस्थेच्या मुख्य इमारतीमधील २०० व्यक्तिची बैठक व्यवस्था असलेल्या सभागृहाचे “श्री. पा. कृ. नगरकर सभागृह” असे नामकरण करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.