माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1275 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे, यात महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकं,
तर मुंबईतील 32 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेमार्फत महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांचं रूप पालटणार आहे. रेल्वे परिसरात रिक्षा, टॅक्सी, बससारख्या
वाहनांसाठी योग्य नियोजन करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकांना जोडूनच काही इमारती, घरं आहेत, त्यामध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत आणि लवकरच या स्थानकांबाहेरील परिसरात काही बदल
केलेले दिसणार आहेत.या मास्टर प्लॅनची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यानं केली जाणारे. रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर व्हावा,सर्व सुविधा असलेली प्रतीक्षालयं, चांगल्या दर्जाची शौचालयं, गरजेनुसार लिफ्ट, एस्केलेटर,
फ्री wifi, वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेअंतर्गत खाऊ, वृत्तपत्र, पुस्तकांच्या विक्रीसाठी लहान स्टॉल्स,आवश्यकतेनुसार रूफ प्लाझा आणि दिव्यांगांच्या दृष्टीनं काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. इतकंच नाही तर उत्कृष्ट दर्जाची विश्रामगृह,
बिझनेस मीटिंग्ससाठी विशेष जागा अशा सर्व सुविधा प्रत्येक रेल्वे स्थानकावर देण्यात येणार आहेत. स्थानकांच्या छतांची नव्याने बांधणी, नवी तिकीट खिडक्या, स्थानकात येण्या-जाण्यासाठीच्या जागांचं सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे.
अहमदनगर, गोंदिया, बारामती, भंडारा रोड, भुसावळ, ठाणे, हुजूर साहिब नांदेड, दौंड, देहू रोड, हिंगोली, इगतपुरी, लातूर यासह महाराष्ट्रातील एकूण 123 स्थानकांचं रूप पालटणार आहे, तर मुंबईत वांद्रे टर्मिनस, चर्नी रोड, दिवा, कल्याण, जोगेश्वरी,
दादर, माटुंगा, मुंबई सेंट्रल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा एकूण 32 रेल्वे स्थानकांवर याच महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. मुंबईतील 32 तर एकूण महाराष्ट्रातील 123 रेल्वे स्थानकांवर एप्रिल महिन्यातच कामाला
सुरुवात होणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या आरामदायी आणि सुकर प्रवासासाठी रेल्वेचं पाऊल महत्त्वाचं ठरणार आहे.