माय महाराष्ट्र न्यूज: नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.
शैक्षणिक धोरण येणाऱ्या काळात महत्वाचं ठरावं या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या नवीन धोरणाची आंमलबजावणी सरकारकडून या वर्षीपासूनच करण्यात येईल.” असे शिक्षण मंत्री
दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. या नवीन धोरणानुसार इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकवला जाणार असून, सध्या मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.
या धोरणामध्ये किमान इयत्ता 5 ते 12 वी आणि त्यानंतर उच्च शिक्षण इंग्रजी, हिंदी, संस्कृत भाषेसह आपापल्या राज्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये घेता येणार आहे. विद्यार्थ्याला कुठल्या भाषेत शिक्षण घ्यायचे आहे. याचा त्याला
संपूर्ण अधिकार असणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता वापरण्यासाठी भारतीय सांकेतिक भाषा (आयएसएल) संपूर्ण देशभरात प्रमाणित केली जाणार आहे. येणाऱ्या काळात शैक्षणिक क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण संपूर्ण देशात राबवण्यात येणार आहे.
कसे असणार शैक्षणिक वर्षाचे टप्पे?
पहिल्या टप्यात : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी
दुसऱ्या टप्यात : इयत्ता तिसरी ते पाचवी
तिसऱ्या टप्यात : इयत्ता सहावी ते आठवी
चौथ्या टप्यात : इयत्ता नववी ते बारावी
नवीन शैक्षणिक धोरणानुसार, बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार
परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच इयत्ता 9 वी पासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर मध्ये विभागण्यात आलं आहे. तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा देखील विचार करण्यात येणार आहे.