माय महाराष्ट्र न्यूज:येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे,
अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावर विखे पाटील यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे, असे काहीही होणार नसून मला बदनाम करण्यासाठी
हे षडयंत्र असून कपोलकल्पीत बातम्या दिल्या जात आहेत, असे विखे पाटील म्हणाले.विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना नगर जिल्ह्यात सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या
या बातम्यांसंबंधी विचारण्यात आले. त्यावर विखे पाटील म्हणाले, “माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्याचे काम
काही मंडळी करीत आहेत.माझी बदनामी करण्याच्या हेतू आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही, राज्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे.
राज्याचा हा निर्णय पंतप्रधानांच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही”, असेही विखे पाटील म्हणाले.