माय महाराष्ट्र न्यूज:– माती आणि पाणी या दोन मूलभूत घटका शिवाय मानवाचे जीवन अशक्य आहे.शेत जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने वेगाने वाहून जाते आणि त्या
पाण्याबरोबर जमिनीतील सुपीक मातीचा थर ही वाहून जातो.शेत जमिनीत सुपीक मातीचा एक इंच थर तयार होण्यास हजारो वर्षांचा कालावधी लागतो.म्हणून तो वाहून जाऊ नये यासाठी जलसंधारण बरोबरच मृदासंधारण व वृक्षसंवर्धन
गरजेचे असल्याचे प्रतिपादन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मुळा एज्युकेशनच्या कृषि महाविद्यालय, सोनई, राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शनीशिंगणापूर येथे सुरू आहे.
त्यात प्रबोधनपर व्याख्यानमालेत “जलसंधारण व मृदासंधारण काळाची गरज” या विषयावर स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना जलमित्र सुखदेव फुलारी बोलत होते.कृषि महाविद्यालयाचे प्रा.सोमनाथ दरंदले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
श्री.फुलारी पुढे म्हणाले की, कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणे गरजेचे आहे. यासाठी सेंद्रिय खताचा वापर करून जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञानही महत्त्वाचे आहे.एका प्रतिदिन माणसाला ५५ लिटर
पाणी लागते. पाणी कधीही शिळे होत नाही. त्याचा काटकसरीने वापर करावा. जलसंधारणा बरोबरच मृदासंधारण व वृक्षसंवर्धन देखील महत्त्वाचे आहे.माणसाच्या अतिक्रमणामुळे ओढे-नाले,शेतीचे बांध सपाट झाल्याने पाणी वाया जात आहे.पाण्याचा
अतिरेकी वापर थांबणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीपेक्षा नवीन तंत्रज्ञान अवगत करून शेतीतील उत्पादने वाढवावी. पाणी उपलब्धतेनुसार पिकाचे नियोजन होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संदिप तांबे यांनी प्रास्ताविकामध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाची माहिती दिली. विद्यार्थिनी भाग्यश्री खाडे हिने सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कांबळे याने आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे ५० स्वयंसेवक उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान व मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिराचा समारोप होणार आहे.
प्रशांतभाऊ गडाख यांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपले गाव आदर्श करावे…
आपण अधिकारी-पदाधिकारी झाल्यानंतर कोणत्याही खुर्चीवर बसा, परंतु शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम करा. त्याला विसरू नका. त्याच्या समस्या सोडवा. प्रशांतभाऊ गडाख यांनी जसे मोरयाचिंचोरे गाव फुलविले, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपले गाव आदर्श गाव करण्याचा प्रयत्न करावा. -जलमित्र सुखदेव फुलारी