माय महाराष्ट्र न्यूज:येणाऱ्या आठ दिवसात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान
भुमरे हे फक्त आठ दिवसाचे पालकमंत्री आहेत, असंही खैरे म्हणाले. संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा दावा केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन ९ महिने उलटून गेली. शिवसेनेतील फुटीवर सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. काही दिवसातच सुप्रीम कोर्टाचा निकाल हाती येऊ शकतो असं बोललं जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी येणाऱ्या आठ दिवसात शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.छत्रपती संभाजीनगरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या
निमित्ताने अभिवादन करण्यासाठी सर्व जण जमले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी हा दावा केला आहे. यासाठी कारण काय आहे हे तुम्ही शोधा असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे सकाळपासून चर्चांना उधान आले आहे.
माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, कोण पालकमंत्री? मी उन्हात उभा आहे, सुर्याच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने सांगतो, संदीपान भुमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहणार आहेत. तुम्हाला
खोटे वाटत असेल तर लिहून घ्या. त्याने सव्वा 2 कोटी रुपयांची गाडी घेतली. 12 दारूची दुकाने घेतली. एकिकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला निर्व्यसनी होण्याचा सल्ला दिला. ज्या पैठणचे भूमरे हे आमदार आहेत, त्या
संतांच्या भूमीत एकनाथ महाराजांनी व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले. तिथल्याच आमदाराने 12 दारुची दुकाने विकत घेतली आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्यामागे ईडी लागणार असल्याचे भाकित चंद्रकांत खैरे यांनी वर्तवले आहे.