Thursday, October 5, 2023

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

मुंबई, दि. 17

राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने आज (दिनांक 17 एप्रिल) हैदराबाद येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. सन 2021 मध्ये 33 व्या क्रमांकावर असताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि या विभागाचे सचिव संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनामुळे आणि गेल्या वर्षभरात प्रकल्पाला दिलेल्या गतीमुळे राज्याने यावर्षी मूल्यांकनात अव्वल क्रमांक मिळविला.

राज्यामध्ये राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सन 2016 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये विविध तांत्रिक बाबींवर आधारित प्रकल्प राबविण्यात येतात. यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे 336 निरीक्षण विहिरींवरती स्वयंचलित संयंत्र बसवणे, मोबाईल व्हॅन द्वारे जलधर क्षमता चाचणीची माहिती प्राप्त करणे, राज्य भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करणे, सर्वंकष शास्त्रीय बाबींची पायाभूत माहिती आधारे निर्णय आधार प्रणाली विकसित करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना या माहितीचा उपयोग व्हावा, हा त्यामागील उद्देश आहे. या प्रकल्पामधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जागतिक बँकेने आढावा मिशनमध्ये राज्याचे भूजल आयुक्त श्री.जोशी यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये देशातील राज्य व केंद्र शासनाच्या एकूण 49 अंमलबजावणी यंत्रणा आहेत. राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प हा अंतिम टप्प्यात असून पुढील टप्प्यामध्ये प्रकल्पाची वाटचाल होत आहे. याकरिता अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प तसेच आधुनिक तंत्रज्ञान व प्रणालीवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता व इतर काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. जोशी यांनी या बैठकीत दिली. ग्रामीण भागासोबतच शहरी भागात देखील भूजलाच्या व्यवस्थापनाकरिता या प्रणालीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!