शिर्डी
शहरातील विवेकानंद नगरच्या भरवस्तीत झालेल्या ८ लाखांच्या सोन्याचे ऐवज व रोख रक्कम चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी या चोरीचा तपास लावत आरोपीला मुद्येमालासह जेरबंद केले आहे.
तीन दिवसांपूर्वी विवेकानंदनगर येथील कमल ज्ञानेश्वर दसरे हे कुटुंबासह देवदर्शनाला गेल्या असता त्यांच्या बंद घराच्या छताचा पत्रा कापून घरातील ८ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ऐवज व रोख रक्कम चोरी केल्याची घटना घडली होती.शिर्डी पोलिसांनी फिर्याद दाखल होताच तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हे कुटुंब गावाला गेल्यानंतर रात्रीच्या वेळी एक इसम संशयास्पद घराजवळ फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस नाईक संदीप गडाख, कॉन्स्टेबल नितीन शेलार, अजय अंधारे, कैलास राठोड, राजेंद्र बिरदवडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुप्त खबर्यांच्या माहितीनुसार आरोपी कोण असू शकते याचा अंदाज लावत अवघ्या दोन तासात संशयित आरोपी भगवान दिलीप परदेशी, रा. शिर्डी यास शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्हा कबूल करत चोरलेला मुद्देमाल व रोख रक्कम काढून दिली. या गुन्ह्यात आणखीन कोण सामील आहेत त्याचा तपास पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घेत आहेत.