नेवासा
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शेतामध्ये कांदा काढण्याचे काम करीत असलेल्या ४२ वर्षीय शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज बुधवार दि.२६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता सुमारास घडली. सविता राजू बर्फे असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे जेऊर रस्त्यावरील तांबे वस्ती येथे भास्कर तांबे यांच्या शेतामध्ये कांदे काढण्याचे काम काही महिला करत होत्या.कांदे काढण्याचे काम सुरू असताना सायंकाळी सव्वा पाच वाजेची सुमारास आकाशामध्ये ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. कांदे काढनाऱ्या महिलांची आडोस्याकडे जाण्यासाठी पळापळ सुरु झाली.
तेवढ्यात आडोस्याकडे जात असलेल्या सविता राजू बर्फे (वय ४२ वर्षे) यांच्या अंगावर विज पडली,त्यात त्यांचा शेतातच दुर्दैवी मृत्यु झाला. बालाजी देवस्थानच्या रुग्णवाहिकेतून त्यांचा पार्थिव उत्तरिय तपासण्यासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेला आहे.
पोलीस नाईक तुकाराम खेडकर यांनी घटना स्थळी भेट दिली.