माय महाराष्ट्र न्यूज:भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. यावर पंकजा मुंडे यांनी आज सूचक वक्तव्य केले.
पाथर्डीहून औरंगाबाद येथे जात असताना शेवगाव येथे त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, की (स्व.) मुंडे साहेब परळीला आई, तर शेवगाव- पाथर्डीला मावशी मानायचे. त्यामुळे राज्यात मंत्री असताना शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाला परळीपेक्षाही अधिक निधी दिला.
सत्ता होती तेव्हा निधी दिला, आता सत्ता नाही तर वेळ देत आहे. बालमटाकळी येथील दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन करण्याची विनंती उपसरपंच तुषार वैद्य यांनी केली. मात्र, राज्यातील इतरही अनेक गावांतून अशी मागणी असल्याने,
प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होणार नाही. आगामी काळात त्यासाठी नक्की वेळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.पंकजा मुंडे म्हणाल्या, एखाद्या पदामुळे व्यक्ती मोठी किंवा लहान होत नाही. पद असो वा नसो; सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये जाण्याची
शिकवण आम्हाला (स्व.) गोपीनाथ मुंडे यांनी दिली. त्यामुळे सत्तेत व कुठल्याही पदावर नसतानाही जाऊ तिथे लोक गर्दी करतात. ही मुंडे साहेबांचीच पुण्याई आहे. परळी मतदारसंघात
माझा पराभव झाला, तर मी खाली बसले. त्यामुळे आमचे सरकारही खाली बसले, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.