माय महाराष्ट्र न्यूज:नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच नगर ते पुणे इंटरसिटी सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देत नगर रेल्वेस्थानक जंक्शन होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल
असे रेल्वेचे सोलापूर विभागीय मॅनेजर शैलेश गुप्ता यांनी सांगितले. रेल्वेचे सोलापूर विभागीय मॅनेजर शैलेश गुप्ता यांनी नगर रेल्वेस्थानकाला भेट दिली. यावेळी सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी गुप्ता यांच्याकडे नगर-पुणे इंटरसिटी व आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी करून निवेदन देण्यात आले. नगर रेल्वेस्थानक हे जंक्शन होण्याच्या दृष्टिकोनाने प्लॅटफॉर्म 3 आणि 4 लवकर तयार करण्याची मागणी वधवा यांनी यावेळी केली
तर पुणे-लखनौ आणि पुणे-गोरखपूर रेल्वेला नगरला थांबा देण्याची व रेल्वे मध्ये अनधिकृत हॉकर्स यांना प्रतिबंध घालण्याची मागणीदेखील वधवा यांनी केली. यावर शैलेश गुप्ता यांनी या प्रश्नांवर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
अनधिकृत हॉकर्सना पायबंद करण्याचे आदेश कोतवाल यांना दिले. प्रवासी संघटनेच्या वतीने गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.