माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय रेल्वे प्रशासनाने सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रेल्वे भोजन सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये दिली जाणारी भोजन सेवा बंद करण्यात आली होती.
संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. पण कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने १७२ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ पासून देशातील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये
रेल्वे भोजन सेवा पूर्ववत केली जाईल. कोरोना काळात स्थगित केलेली रेल्वे भोजन सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याची प्रक्रिया डिसेंबर २०२१ मध्ये सुरू झाली. आतापर्यंत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गाड्यांमध्ये रेल्वे भोजन सेवा पूर्ववत झाली आहे.
उर्वरित लांब पल्ल्याच्या गाड्यांतील रेल्वे भोजन सेवा सोमवार १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ववत होईल. यानंतर देशातील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये रेल्वे भोजन सेवा मिळेल.रेल्वे भोजन सेवेंतर्गत शिजवलेले ताजे अन्न तसेच पाकिटबंद
अन्न असे दोन प्रकारचे पदार्थ मिळतात. चहा-कॉफी-दूध, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण तसेच रेडीमेड स्वरुपात कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम असे निवडक पदार्थ मिळतात. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक उपक्रमाच्या माध्यमातून रेल्वे भोजन सेवा दिली जाते.