नेवासा
गोदामाईच्या उगमापासून ते सागराच्या संगमापर्यंत स्वच्छता अभियानाची चळवळ अधिक व्यापक झाली पाहिजे असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती भास्करगिरीजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गंगापूर तालुक्यातील जूने कायगाव येथील श्री रामेश्वर संस्थातर्फे गोदावरी प्रगट दिनानिमित्त आयोजित गंगापूजन सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी प्रगट दिनाच्या निमित्ताने गोदावरी नदीचे विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यानंतर
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना भास्करगिरीजी महाराज पुढे म्हणाले, गोदावरी आपली माता आहे. म्हणून आपण पुत्राप्रमाणे तिची काळजी घेतली पाहिजे. नदीत आपण कोणत्याही प्रकारचा कचरा, भंगलेल्या मूर्ती, देवतांचे फोटो, निर्माल्य यांचे नदीत विसर्जन न करता जमिनीतच खड्डा खोदून त्यांचे विसर्जन करावे.गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक डॉ. जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितले की, गोदामाईची आपण स्वच्छता राखणे हे देखील तिचे पूजनच आहे.
यावेळी कैलासगिरीजी महाराज, बजरंगदास महाराज, बाळकृष्ण महाराज दिघे, दादा महाराज वायसळ, मारुती महाराज जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
गोदावरी नदी स्वच्छता कार्यासाठी राहुल कुलकर्णी, कायगावचे तलाठी सतीष क्षीरसागर आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी गोदावरीची सपत्नीक पूजा केली. घाटावर सगळीकडे दिवे लावण्यात आले होते. यामुळे दिव्याच्या प्रकाश झोतात गोदामाईचे रूप उजळून निघाले होते. बंडू काका गोसावी आणि मनीष देवळे यांनी पौराहित्य केले. संतोष माने, प्रदीप भैया पाटील, कल्याण गायकवाड, भाऊसाहेब शेळके, भाऊसाहेब गवळी आदींची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री रामेश्वर संस्थानचे सदस्य संतोष बिरुटे, सचिन भोगे, नितीन कान्हे आदींनी पुढाकार घेतला. गोदावरी नदी स्वच्छ राखण्याचा संकल्प करून या सोहळ्याची सांगता झाली.