माय महाराष्ट्र न्यूज:छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांनी येत्या 19 जानेवारी रोजी साजरी केली जाणाऱ्या शिवजयंतीसाठी जोरात तयारी सुरू केली आहे. अशात राज्य सरकारने
शिवजयंती साजरी करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना गर्दी न करता इतरांच्या आरोग्याची काळजी घेत शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
शिवजयंतीसाठी राज्य सरकारचे मार्गदर्शक तत्त्वे:कोविड -19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे.
शिवजंयतीच्या दिवशी शिवज्योत वाहण्यासाठी 200 भाविकांना व शिवजयंती उत्सवासाठी 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.
कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता गर्दी टाळून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
शिवजयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्याऐवजी केबल नेटवर्क किंवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
प्रभात फेरी, बाईक रॅली किवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावी.
शिवजयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रम किंवा शिबिरे (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजारांच्या उपायांबाबत जनजागृती करावी.
आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करताना सोशल डिस्टंसिंग आणि कोरोनाचे नियम पाळावे.कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
तसेच शिवजयंतीपर्यंत मधल्या काळात आणखी काही सूचाना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे अनुपालन करावे.