माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी बुद्रूक येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहाचे
उद्घाटन निवृत्ती महाराज इंदुरीकर हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वखाली गेल्या ३७ वर्षांपासून लोणीत एक गाव, एक शिवजयंती हा उपक्रम राबवला जातो. यावर्षीच्या सप्ताहाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. यावेळी
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सरपंच श्रीमती कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते.
विखे पाटील यांच्याबद्दल बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘शिवजयंतीचा उत्सव फक्त गर्दी जमवण्यासाठी नाही तर विचारांचे मंथन करण्यासाठी झाला पाहिजे. विखे पाटलांच्या पुढाकारातून
सलग ३७ वर्षे एक गाव एक शिवजयंती हा उत्सव कौतुकास्पद आहे. विखे पाटील परिवाराने सर्व समाज घटकांना एकत्रित ठेवून आजपर्यंत वाटचाल केली. सहकाराचा मंत्र येथील मातीत
रुजवला. शिक्षणाची पायाभरणी करुन, असंख्य पिढ्यांचे भविष्य घडवण्याचं मोठं काम केलं,’ अशी स्तुतीसुमने इंदुरीकर महाराज यांनी उधळली आहेत.दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा
जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विखे पाटील यांचा यावेळी ग्रमस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.