नेवासा/सुखदेव फुलारी
राज्य सरकारने पुन्हा सुरू केलेल्या ”जलयुक्त शिवार अभियान २.०” अंतर्गत नेवासा तालुक्यातील १२ गावांची निवड करण्यात आली असल्याने ही १२ गावे पाणीदार होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन २०१४ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार अभियान योजना राबवण्यात आली होती.त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेवर आक्षेप घेत ती बंद करण्यात आली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात येताच ”जलयुक्त २.०” ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. ”जलयुक्त २.०” मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुका पातळीवरील प्रांताधिकारी समितीने शिफारस केलेल्यापैकी १२ गावांची निवड केली आहे.
यात जास्त उपसा झालेली, टँकरग्रस्त,अटल भूजल प्रकल्प कृषी सिंचन योजनेतील गावांच्या निवडीस प्राधान्य देण्यात आले आहे.
पूर्वीच्या योजनेत गाव हा घटक धरून जलसंधारणाची कामे केली जात होते. जलयुक्त २.० मध्ये आता माथा ते पायथा या पद्धतीने पाणलोटनिहाय कामे केली जाणार आहेत. पूर्वीच्या जलयुक्त १ मध्ये निवड झालेली परंतु कामे अपूर्ण असलेली गाव निवडण्यात आली आहेत.अपूर्ण व प्रगतीपथावरील प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे.
त्यानुसार अपूर्ण व प्रगतीतील कामे प्राधान्याने, त्यानंतर क्षमता पुनर्स्थापित करणे (दुरूस्ती व नूतनीकरण), क्षेत्र उपचार कामे, नाला उपचार कामे, लोकसहभाग किंवा सार्वजनिक खासगी भागीदारीतील कामे केली जाणार आहेत.जलसंधारण विभाग,कृषि विभाग,पाटबंधारे विभाग व वन विभाग मिळून ही कामे करणार आहेत.
कृषी विभागामार्फत शेत बांधबंदिस्ती, सलग समतलचार, दगडाचे बांध, गॅबियन बंधारे, मातीचे नालाबांध, सिमेंट काँक्रिट नालाबांध, शेततळे, नाला खोलीकरण व गाळ काढणे, विहीर पुनर्भरण अशी कामे करण्यात येणार आहेत.
वन विभागामार्फत सिमेंट बंधारे, मातीनालाबांध, दगडी बांध, गॅबियन बंधारे, सलग समतल चारी अशी कामे करण्यात येणार आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतक- याच्या शेतजमिनीवर वृक्ष लागवड करणे, कन्या वन समृद्धी योजना, अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत बांबू शेती लागवड, अटल आनंदवन घनवन योजना, वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना योजना राबवण्यात येणार आहे.
भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेमार्फत पुनर्भरण चर, पुनर्भरण चर आणि विंधन विहीर, भूमिगत बंधारे, गॅबियन बंधारे, अटल भूजल योजना, जलजीवन मिशन स्रोत बळकटीकरण करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. मृद व जलसंधारण विभागामार्फत सिमेंट नालाबांध, कोल्हापुरी पध्दतीचे बंधारे आणि पाझर तलाव दुरुस्ती कामे करण्यात येणार आहेत.
नेवासा तालुक्यातील फत्तेपूर, लोहरवाडी, झापवाडी, चांदा,घोडेगाव,सोनई,करजगाव,सुकळी खुर्द,पिचडगाव, राजेगाव,चिंचबन, सौंदाळा या १२ गावांची जलयुक्त शिवार २.० साठी निवड झाली आहे
*गाव निवड निकष असे…*
*अवर्षण प्रवण तालुक्यातील गावे.
*भूजल सर्व्हेक्षण विभागाकडील पाणलोट प्राधान्यक्रमानुसार गावे
*महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर यांचे पाणलोट प्राधान्य क्रमानुसार गावे
*अपूर्ण पाणलोट
*ग्राम सभेच्या मान्यतेने/लोकसहभाग / स्थानिक जिल्हा समितीने शिफारस केलेली तथापि पाण्याच्या ताळेबंदावर आधारीत पात्र कामे.
*जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत नेवासा तालुक्यातील नोडल अधिकारी असे…*
* तालुका कृषी अधिकारी,नेवासा (फत्तेपूर,लोहरवाडी, झापवाडी, चांदा).
* उपविभागीय अभियंता,मुळा पाटबंधारे उपविभाग घोडेगाव (घोडेगाव,सोनई,करजगाव,सुकळी खुर्द).
* उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ( पिचडगाव, राजेगाव,चिंचबन,सौंदाळा).
*२० मे पर्यंत गाव आराखडे तयार होतील..*
राज्य सरकारने पुन्हा सुरू केलेल्या ”जलयुक्त शिवार अभियान २” अंतर्गत नेवासा उपविभागातील नेवासा तालुक्यातील १२, शेवगाव तालुक्यातील १० व पाथर्डी तालुक्यातील १५ अशा ३७ गावांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या गावात सध्या शिवार फेरी सुरू आहेत. येत्या २० मे पर्यंत गाव आराखडे तयार केले जाणार आहेत.