भेंडा
मंदिर असो किंवा संस्था,तिच्या विश्वस्तांनी मेवा मिळण्याची अपेक्षा न करता सेवक म्हणून सेवा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केले
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे श्रीक्षेत्र पावन दक्षिण मुखी हनुमान मंदिरात श्रीराम सेवा मंडळाने श्री.अभंग यांचे प्रवचन आयोजीत केले होते.त्यावेळी ते बोलत होते.
काशिनाथ नवले,तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे,बापूसाहेब नजन,बबनराव धस,गोरे महाराज,वाल्मीक लिंगायत,विश्वास कोकणे,राजेंद्र तागड आदी यावेळी उपस्थित होते.
श्री.अभंग पुढे म्हणाले, युद्ध प्रसंगी अर्जुनाला नातेवाईकांचा मोह झाला, त्यावेळी मोहातून बाहेर पडण्यासाठी अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता उपदेश केला.भगवद गीतेमध्ये जीवनाचे कल्याण व सार्थक करण्याचे तत्वज्ञान आहे. सर्वसामान्य माणूस,स्री आणि शुद्र यांना ज्ञानाचा अधिकार नसणाऱ्या कालखंडात ज्ञानेश्वर माऊलीने संस्कृत मधील गीतेचे प्राकृत मध्ये रूपांतर करून सर्वांसाठी ज्ञानाचे व्दारे उघडे करून ज्ञानाची पहिली कोंडी फोडली. माणसाच्या जीवनामध्ये सुरू असलेल्या महाभारताच्या अनुषंगाने अनेक ओव्या ज्ञानेश्वरीत आहेत.नरदेह किती महत्त्वाचा आहे याचे वर्णन आहे. काम,क्रोध,मद,मत्सर दूर करणे करीता ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान उपयोगी पडते.समाजाचे विघटन करण्याच्या प्रयत्न म्हणजेच पाप.जन्म कुठे आणि कोणत्या कुळात घ्यावा हे कोणाच्या हातात नसते,परंतु कर्तुत्व सिद्ध करणे हे मात्र आपल्या हातात असते. तुकाराम महाराजांनी गाथे मधून जातीभेद दूर करण्यासाठी उपदेश केला आहे. जीवनात अनेक वाटा आहेत,कोणत्या वाटेने जायचे ते ज्याने त्याने ठरवावे. माणसातला मी पणाच त्याला रसातळाला घेऊन जातो,त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्यातील मीपणा दूर केला पाहिजे.
प्रवचनानंतर उपस्थित भाविकांना अशोकराव मिसाळ यांच्या वतीने आमटी भाकरीचा महाप्रसाद देण्यात आला.