माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ व दिव्यांग नागरिकांना जीवन उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.
ते पुढे म्हणाले की, परस्परांचे घोटाळे झाकण्यासाठी राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रवक्ते सध्यातरी महाराष्ट्राचे मनोरंजन करत आहेत. सरकारच्या कार्यपद्धतीमुळे
हे पक्ष संपतील व पुन्हा एकदा राज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा आशावाद खासदार विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस एकाच माळेचे मणी आहेत.
आपण सर्वजण मिळून भ्रष्टाचार करून जनतेचे वीज, पाणी व इतर प्रश्नांबाबत हाल करू, आपले सरकार जाणार नाही, याची काळजी घेऊ असे त्यांना वाटते. राज्यामध्ये किती आघाड्या होऊ द्या, मात्र जिल्ह्यामध्ये समविचारी पक्षांना व घटकांना
बरोबर घेऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 50 वर्षांपासून आमचे कुटुंब या प्रवृत्तीच्या विरोधात असून यापुढील काळातही राहील, असेही खासदार विखे म्हणाले.
चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले आहे. राज्यातील महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेला घटक पक्ष काँग्रेस माझ्या दृष्टीने संपला आहे. शिवसेनेने व राष्ट्रवादीने आपले कार्य जनतेसमोर मांडावे असे विखे म्हणाले.