माय महाराष्ट्र न्यूज:अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी, कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या
कल्याणकारी योजनांसाठी ३ हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचा दावा केला. तसेच हे वर्ष ‘‘महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष’’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना पवार यांनी महिला
शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्के तरतूद वाढवून ५० टक्के करण्यात येईल. तसेच कृषी विभागाच्या योजनांमध्ये यापुढे तरतुदीच्या ३ टक्के निधी आजी-माजी सैनिकांनाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले.
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून
साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. तसेच गेल्या १० वर्षांपासून रखडलेला भूविकास बँकेचा प्रश्न निकाली काढताना या बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी
देण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत वेळीच सुधारणा झाल्या नाहीत तर त्यातून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.कर्जमाफी योजनेत सरकारने नियमित पीक कर्जफेड केलेल्या
शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये अनुदान देण्याचे दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. करोनामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने या अनुदानाची मागणी केली जात होती.
दोनच दिवसांपूर्वी या मागणीवरून विरोधकांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाब विचारल्यानंतर याबाबत लवकरच दिलासादायक निर्णय घेण्याची ग्वाही पवार यांनी दिली होती. त्यानुसार नियमित कर्जफेड
करणाऱ्या २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा पवार यांनी केली.