माय महाराष्ट्र न्यूज:हभप इंदोरीकर महाराज यांनी ऑडिओ क्लिप बद्दल कंपनी संदर्भात दिलेल्या तक्रार अर्जाचा निपटारा केला असून, यामध्ये संबंधित कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाल्याची
माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.माझ्या कीर्तनाच्या बनावट सीडी प्रसारित करण्याचा प्रकार सध्या घडत असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली होती. माझ्या कीर्तनाचे माझ्या संमतीशिवाय व्हिडीओ काढून ते अनधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये पुणे जिल्ह्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
काहींनी माझ्या कीर्तनाच्या सीडी बनावट तयार करुन त्या शेमारू म्हणजेच मराठी बाणा या वाहिनीवरून प्रसिद्ध करत असल्याचे मला समजले आहे. कीर्तनामध्ये काही छेडछाड करून चुकीचं प्रसिद्ध होण्याची शक्यता असून या माध्यमातून माझी बदनामी होण्याचा संभव आहे.
मराठी बाणा या वाहिनी बरोबर कोणताही करार केलेला नसताना माझ्या हक्कावर गदा आणून अनधिकृतपणे सीडी प्रसारित करत आहे, सदर या वाहिनीवर माझी कीर्तने प्रसिद्ध करू नये म्हणून त्यांच्या विरुद्ध योग्य
ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी इंदोरीकर महाराज यांनी केली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, इंदोरीकर महाराज यांनी दिलेल्या अर्जाबाबत माहिती घेऊन संबंधित कंपनीकडे तपासणी केली. संबंधित कंपनीने
त्यांच्याकडील कागदपत्रांनुसार रीतसर परवानगी घेतलेली असल्याने कंपनीची कोणतीही चूक नाही, असे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे.