माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या वयोश्री योजनेत अहमदनगर जिल्ह्याने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील तब्बल ४० हजार वयोवृद्ध नागरिकांना
गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून अपंगांना व्हिलचेअर, काठी, वाॅकर, दृष्टीदोष असणाऱ्यांना चष्मे आणि इतर अशा ३५ प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी ही योजना
जिल्ह्यात प्रभावीपणे राबवत आजवर तब्बल ४० हजार वयोवृद्धांना साहित्याचे वाटप केले आहे. आज आणखी १३०० नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत
शिर्डीमध्ये आज १३०० दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांना पुन्हा शिर्डीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत
रामदास आठवले पुन्हा एकदा शिर्डीतून उमेदवारी करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डीत येण्याचं निमंत्रण दिल्यानंतर रामदास आठवले यांनीही मी कायमच शिर्डीत येत असतो. जर मी आलो तर तुम्हाला साथ द्यावी लागेल असे म्हणत
पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली.२००९ साली रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
राज्यात काँग्रेसचे तत्कालीन मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळेच आठवलेंचा पराभव झाल्याच्या वावड्या त्यावेळी उठल्या होत्या. त्यानंतर रामदास आठवले २०१४ साली भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार आणि थेट केंद्रात राज्यमंत्री झाले.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपचा रस्ता धरला. विखे आणि आठवले दोघेही भाजपच्या गोटात असल्याने विखेंनी आठवलेंना पुन्हा शिर्डीत येण्याचे एक प्रकारे निमंत्रणच दिले आहे.