माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील सरकार पडणार, राष्ट्रपती राजवट लागणार या फक्त बातम्या आहेत. जोपर्यंत शिवसेना किंवा राष्ट्रवादी भाजप सोबत येणार नाही किंवा काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही
तोपर्यंत सरकार टिकून राहील. शिवसेना स्वतंत्र लढली तर दोन-चार खासदारही निवडून येणार नाहीत. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला शिवसेनेने मान्य करून भाजप सोबत यावे.’ असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री
रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नेमकं कोणत्या प्रकारचं राजकारण सुरु आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलं आहे. राज्यमंत्री आठवले नगर जिल्ह्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
दरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, ‘दोन-तीन मंत्र्यांची चौकशी झाली म्हणून सरकारला काही धोका आहे असे होत नाही. मात्र, आता 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका
भाजपसाठी सोप्या झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाल्यानंतर आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे ठरवू. आरपीआय आठवले गट हा नोंदणीकृत पक्ष आहे, हेही लक्षात घ्यावं,’असंही आठवले म्हणाले.
राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर बोलताना आठवले म्हणाले, ‘दोन्ही बाजूने कुणाचा अवमान होईल असे बोलू नये. पूर्वीच्या काळी वेगळी नीतिमत्ता होती आता मात्र या संबंधात कटुता दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी
महाराज शूर होते. त्यांना माता जिजाऊंनी धडे दिले आणि छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले.’ असेही आठवले म्हणाले.